Wednesday 19 April 2017

आपला हजारो चाहत्यांसमवेत कापला केक.....सोनू निगम, शान ने वाढवली रंगत

             हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘जम्पिंग जॅक’ अभिनेता म्हणून नावाजलेले बॉलीवूडचे ज्येष्ठ कलाकार जितेंद्र यांचे व्यक्तिमत्व प्रत्येकांना लुभावणारे असेच आहे! तरुणांनाही लाजवेल असे चिरतरुण आणि स्वास्थ्य लाभलेल्या या बॉलीवूडस्टारने नुकतेच ७५ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या या हेल्दी पंच्याहत्तरी निमित्ताने स्वयम्दीप सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था आयोजित 'सेलिब्रेटिंग जितेंद्र' हा मेगा म्युजीकल शो नुकताच सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. आपल्या हजारो चाह्त्यांच्या इच्छेखातर जितेंद्र यांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावत, पंच्याहत्तरी साजरी केली. एव्हढेच नव्हे तर, आपल्या सिनेमाच्या गाण्यावर ठेका धरत त्यांनी प्रेक्षकांनादेखील नाचवले. 


या कार्यक्रमात जितेंद्र यांच्या चित्रपटातील गाण्यांचे मेगा लाइव कॉन्सर्ट सादर करण्यात आले, विशेष म्हणजे शान आणि सोनू निगम यांनी देखील या कॉन्सर्टमध्ये गाणे गात कार्यक्रमाची संध्याकाळ म्युजीकल केली. एव्हढेच नव्हे जितेंद्र यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न ज्येष्ठ संगीतकार हरीश भिमानी यांनी आपल्या खुमासदार निवेदनातून केला. जितेंद्र यांनी देखील त्यांना पुरेपूर साथ देत साभागृहात हास्याची लाट आणली. जीतेद्र यांच्या 'हेपी बर्थ डे टू यू' या सुप्रसिद्ध गाण्यांवर शान, सोनू निगम तसेच इतर सर्व गायकांनी ताल धरत जितेंद्र यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या. यादरम्यान, त्यांच्या हिंदी सिनेसृष्टीतील अभिनयाच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा 'हिम्मतवाला' हा पुरस्कार देऊन गौरवदेखील करण्यात आला.   





जितेंद्र यांची अभिनय कारकीर्द आजच्या तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेल्या जितेंद्र यांना हिदी चित्रपटसृष्टीतले हे यश टिकवून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. एकवेळ त्यांची कारकीर्द संपुष्टात आली असे वाटत असतानाच हिम्मतवाला, खुदगर्ज या सारख्या चित्रपटाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा नव्याने सुरवात केली. अथक परिश्रम आणि अत्माविश्वाच्या जोरावर जितेंद्र यांनी यशाची पुन्हा पुन्हा मुसंडी मारली आहे. त्यांच्या याच परिश्रमाची दखल 'सेलीन्रेटिंग जितेंद्र' या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आली. जितेंद्र यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनीदेखील या कार्यक्रमात अपेक्षेहून अधिक हजेरी लावली होती, स्वयम्दीप सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. भावनाराज यांनी हा संगीत सोहळा खास बनविणाऱ्या सर्व कलावंतांचे आभार मानले. तसेच 'जितेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. 'सेलिब्रेटिंग जितेंद्र' या शोद्वारे जमा झालेली रक्कम निधीच्या रुपात सामाजिक कार्यात वापरण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. 

No comments:

Post a Comment