Friday 30 December 2016

प्रथमेश परब घेऊन येणार एक नवीन शॉर्टफिल्म....

                               टाईमपास या चित्रपटामधून  नावारूपाला आलेला अभिनेता प्रथमेश परबने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि देहबोली,भाषाशैलीने रसिकप्रेक्षकांची मनं जिंकली. टाईमपास नंतर बालक पालक,उर्फी या चित्रपटांमध्ये त्याने त्याच्या अभिनायाचे कौशल्य दाखवून दिले. आता प्रथमेश पुढे काय करणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असेलंच. त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे पुढच्या वर्षी प्रथमेश एक शॉर्ट फिल्म घेऊन येतोय महत्वाची गोष्ट म्हणजे याच दिग्दर्शन तो स्वतः करणार आहे. खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित हटके असं कथानक या शॉर्टफिल्म मध्ये असणार आहे. हि शॉर्टफिल्म प्रथमेशच्या खूप जवळची आहे असं तो म्हणाला. तसेच हि शॉर्टफिल्म फेस्टिवल ला देखील पाठवणार आहेत. याच चित्रीकरण पार्ले टिळक विद्यालयातील स्पोर्ट्स अकॅडेमी मध्ये झालं आहे...



                              नवीन वर्षाचा त्याच्या संकल्प विचारला असता येत्या वर्षी तो नवीन गोष्टी करण्यासाठी उत्सुक आहे.. नवीन येणाऱ्या प्रोजेक्ट्सवर काम करून त्याला काही नवीन शिकण्याची इच्छा आहे. प्रथमेशच्या नवीन संकल्पासाठी आणि त्याच्या शॉर्टफिल्म साठी majja.ooo तर्फे शुभेच्छा.





majja.ooo : Ankita Lokhande. 

स्वप्नील जोशी थिरकणार हजार कलाकारांसोबत....

                                 'स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी' ह्या आगामी मराठी चित्रपटाच्या मुहूर्तानंतर या चित्रपटातून काहीतरी नवीन बघायला भेटणार याचं कुतुहूल सर्वांनाच आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेलं नावं म्हणजे गणेश आचार्य. यांच्या दिग्दर्शित झालेल्या या चित्रपटाचा मुहूर्त J.W.marriott मुंबई येथे झाला. यामध्ये अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफ यांनी खास उपस्थिती दर्शवली होती . चिकनी चमेली,मल्हारी या गाण्यांचं दिग्दर्शन त्यांनी त्यांच्या फेमस स्टाईल मध्ये केलेलं आपण सर्वानीच पाहिलं. महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटातील एका गाण्यामध्ये तब्बल एक हजार कलाकारांचा या गाण्यात सहभाग केला गेला आहे. मराठी मध्ये पहिल्यांनदाच इतके कलाकार एका गाण्यामध्ये दिसणार आहे. गणेश आचार्य आहेत म्हणजे नृत्य आणि सेट हे बघण्यात खरी मज्जा आहे. मुंबईतील फिल्मसिटी मध्ये या गाण्याचे चित्रीकरण जोरात सुरु आहे. या चित्रपटातील देवा हो देवा हे गाणं सुखविंदर सिंग यांच्या बेधडक आवाजाने सजलं असून हे पुढील वर्षाचं सुपरसॉंग असणार यात काही शंका नाही. हे गाणं स्वप्नील जोशी,ऋचा इनामदार,गुरु ठाकूर,कीर्ती आजरकर  यांच्यावर चित्रित झालं आहे.





                                  मी मराठी फिल्म एंटरटेनमेंट प्रस्तुत  गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार निर्मित गणेश आचार्य दिग्दर्शित 'स्वामी तिन्ही जगाचा...भिकारी ' हा चित्रपटात गणेश आचार्य अजून कोणता नवीन ट्विस्ट घेऊन येतील याची प्रेक्षकांना वाट बघावी लागेल.









majja.ooo : Ankita Lokhande.

'लागीर झालं रं'....

                               २०१६ मध्ये सुपरहिट असलेल्या सैराट चित्रपटाने सर्वाना वेड लावून सोडलं होतं आता २०१७ मध्ये तसेच काहीतरी होणार असे अपेक्षित आहे. प्रकाश पवार दिग्दर्शित रांजण हा आगळा वेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.या चित्रपटाच्या मोशन पोस्टर नंतर आता नवीन काय येणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक खास गोष्ट म्हणजे चित्रपटाचं लागीर झालं हे गाणं आता प्रेक्षकांसमोर आलंय. या गाण्यात दोन नवीन चेहरे बघायला भेटतात. गाण्याचं टिझर बघता हा चित्रपट कुठेतरी सैराटची आठवण करून देतो.हि नवीन जोडी टिझर बघताना विशेष लक्षात राहाते. यश आणि गौरी हि ह्या लहान मुलांची नावं आहेत. उत्तम अभिनय आणि मनात घर करणारी सिनेमॅटोग्राफी.


अजय गोगावलेच्या बेधडक आवाजामुळे हे  गाणं अजूनच खुलून आलंय. चित्रपटाचं एकूण मेकिंग बघता हा चित्रपट सैराटच्या रांगेत उभा राहील का याकडे सर्वांचं लक्ष आहे.महागणपती एंटरटेनमेंट प्रस्तुत रवींद्र कैलास हरपळे निर्मित प्रकाश जनार्धन पवार लिखित आणि दिग्दर्शित 'रांजण' या चित्रपटाची इतर गाणी सध्या गुलदस्त्यात आहेत आणि या चित्रपटाची इतर गाणीही अशीच हिट असतील यात काही शंका नाही. चित्रपटाचे नाव कुतुहल वाढवणारं असून प्रेक्षकांच्या अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करेल कि नाही हे चित्रपट पाहूनच कळेल.







majja.ooo : Ankita Lokhande. 

Wednesday 28 December 2016

ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गवळी यांचे दिग्दर्शनात पदार्पण...

                                    मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत कलाकारांपैकी एक गाजलेलं नाव म्हणजे मिलींद गवळी. अभिनय आणि  चित्रपटांची आवड त्यांना लहानपणापासून होती. चित्रपटसृष्टीत काहीतरी करून दाखवावं हे स्वप्न त्यांनी खूप आधीच पाहिलं असून अभिनयाची हि आवड त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन आली.यावेळेस दोन चित्रपट त्यांच्या वाटेला आले "Hum Bachche Hindustan Ke"आणि "Waqt Se Pehle".आणि त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. यानंतर त्यांनी एक चढ़ एक चित्रपटांची रांगच लावली. मराठी,हिंदी,मल्याळम या भाषेत त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिका केल्या. त्यांची देहबोली,भाषाशैली आणि उत्कृष्ट अभिनयाने ते प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. मराठी मध्ये विठ्ठल विठ्ठल,देवकी,सक्खा भाऊ पक्का वैरी,आई,मराठा बटालियन यांसारख्या चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून त्यांनी रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. हिंदी मध्ये चंचल,वर्तमान यांसारखे चित्रपट देखील त्यांच्या वाटेला आले. आर्यन या मल्याळम भाषिक चित्रपटात देखील त्यांनी काम करून त्यांच्या अभिनयाचे कौशल्य सिद्ध केलं.एकाहून एक चित्रपट देऊन त्यांनी ग्रामीण भागातही प्रचंड लोकप्रियता मिळवली.


   हिट चित्रपट देऊन आपल्या अभिनयाची छाप पडणारे चतुरस्त अभिनेते मिलिंद गवळी यांनी अभिनयानंतर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. प्रथमच दिग्दर्शकाची धुरा सांभाळून 'अथांग' हा स्त्रीप्रधान चित्रपट २९ जानेवारी २०१६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये अथांग या चित्रपटाला  'Best debut director आणि Best editor असे पुरस्कार मिळाले असून कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये Best screenplay साठी नामांकन झालंय. तसेच मिलिंद गवळी यांचा 'हक्क' या चित्रपटासाठी त्यानां ५ नामांकन मिळाली. या फिल्म फेस्टिवलचा निकाल २९ डिसेंबर २०१६ ला जाहीर करण्यात येणार आहे.
                     रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराला आणि त्यांच्या अभिनयाच्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा.




majja.ooo : Ankita Lokhande.

Tuesday 27 December 2016

दिलीप प्रभावळकर आणि सुकन्या मोने यांची जोडी आता छोट्या पडद्यावर......

                                     दिलीप प्रभावळकर आणि सुकन्या मोने मराठी चित्रपटसृष्टीत गाजलेली नावं. एखादी भूमिका आपल्या अभिनयाने कशी सजवायची याच जिवंत उदाहरण म्हणजे दिलीप प्रभावळकर आणि सुकन्या मोने. आता हि जोडी छोट्या पडद्यावर एकत्र येऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेच्या जबरदस्त यशानंतर दिलीप प्रभावळकर आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येणार आहे. झी मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या 'चूक भूल द्यावी घ्यावी' या मालिकेमध्ये या जोडीचा अभिनय बघायला मिळणं म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक वेगळा अनुभव असणार आहे. जुळून येती रेशीमगाठी या  मालिकेत सुकन्या मोने यांनी माईची भूमिका उत्कृष्टपणे साकारून रसिकप्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली. दोघांच्या अभिनायाची जुगलबंदी म्हणजे 'झी मराठी' च्या प्रेक्षकांसाठी जणू मेजवानीचं आहे असं बोलायला हरकत नाही.

                                        दिलीप प्रभावळकर आणि सुकन्या मोने अभिनित ह्या मालिकेत उतारवयात एकमेकांच्या सोबतीने हसत खेळत, सुखी संसाराचं शिखर सर करणाऱ्या एका 'चिरतरुण' जोडप्याची हि एक खोडकर गोष्ट आहे.  'चूक भूल द्यावी घ्यावी' हि मालिका पाहायला विसरू नका १८ जानेवारीपासून बुध-शनि. रात्री ९.३० वाजता झी मराठीसोबत झी मराठी HD वर




majja.ooo : Ankita Lokhande.

Monday 26 December 2016

अशोक सराफ साकारणार पोलिसाची भूमिका...

                                       १९९० चं दशक आपल्या अभिनयाने गाजवल्यानंतर अशोक सराफ परत एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. विनोदाचं उत्तम टायमिंग आणि त्या वरचढ अभिनय हे अशोक सराफ यांचं वैशिष्टय. आपल्या चाहत्यांसाठी ते एक नवीन कोरा मराठी चित्रपट'सेंटीमेंटल' घेऊन येत आहे.पांडू  हवालदार या चित्रपटात साकारलेल्या त्यांच्या भूमिकेने त्यांना एका रात्रीत सुपरस्टार बनवलं. आता पुन्हा ४० वर्षानंतर ते  'सेंटीमेंटल' या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारत आहे. २०११ मध्ये आलेल्या सिंघम चित्रपटातही त्यांनी कॉन्स्टेबल ची भूमिका साकारली होती,रोल छोटा असला तरी अशोक सराफ ह्यांच्या अभिनयाने ते प्रत्येकाच्या लक्षात राहतात. अशोक सराफ ह्यांच्या सोबत उपेंद्र लिमये आणि रघुवीर यादव सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे.




                          प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये हे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करत आहेत. अभय जी निर्मित समीर पाटील दिग्दर्शित 'सेंटीमेंटल' हा विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.





majja.ooo : Ankita Lokhande.

Saturday 24 December 2016

अमेय वाघ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर....

                              आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे अमेय वाघ.संजय जाधव दिग्दर्शित दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत साकारलेल्या कैवल्य च्या भूमिकेमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्याच्या चाहत्यांसाठी तो प्रत्येकवेळी नवीन काहीतरी घेऊन येतो.दिल दोस्ती दुनियादारी नंतर अमर फोटो स्टुडिओ या नाट्यप्रयोगात मात्र त्याने आपल्या कौशल्याचा चांगलाच प्रभाव पाडला आहे.त्यानंतर जरा हटके काहीतरी म्हणून तो नवीन वेब सिरीज 'कास्टिंग काऊच' मध्ये हि दिसला. खूप वेगळी संकल्पना असल्यामुळे हि वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर एवढ्यावरच अमेय थांबला नाही २०१६ मध्ये दिग्दर्शित झालेला 'घंटा' हा चित्रपट तो आपल्या चाहत्यांसाठी घेऊन आला. या खूप मोठ्या यशानंतर अमेय वाघ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे.


                              कलर्स मराठी वाहिनीवरील 2Mad या नवीन डान्स शो साठी अमेय आता अँकरिंगची धुरा सांभाळणार आहे.तसेच प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर ह्या डान्स शोची जज असणार आहे.हा शो ९ जानेवारी पासून सोमवार-मंगळवार रात्री ९:३० वाजता येणार आहे. मॅड होऊन थिरकायला लावणारा हा शो महाराष्ट्रातील टॅलेंट आपल्यासमोर आणणार आहे. त्यामुळे बघायला विसरू नका हा हटके शो फक्त कलर्स मराठी वाहिनीवर.





majja.ooo:Ankita Lokhande.

Thursday 22 December 2016

हिंदी Sa re ga ma pa Lil Champs ची मराठमोळी परीक्षक -मधुरा कुंभार......

                       Sa Re Ga  Ma Pa या हिंदी झी टीव्ही वरच्या रिऍलिटी शोला लवकरच सुरवात होत असून 'Sa Re Ga  Ma Pa Suron Ka Mahamanch li'l champs' हे या मालिकेचं शीर्षक असणार आहे. li'l champs वरून समजलंच असेल कि हि मालिका घेऊन येतेय लहान मुलांसाठी सुवर्णसंधी.गायनावर आधारित असलेला हा कार्यक्रम १६ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आला आहे. गायनाची इच्छा असलेल्या आणि होतकरू गायकांसाठी Sa Re Ga  Ma Pa ने नेहमीच एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.
                        Zee SaReGaMaPa Singing Superstar 2010 मध्ये नावारूपाला आलेली मराठमोळी गायिका मधुरा कुंभार ची आता Sa Re Ga  Ma Pa Suron Ka Mahamanch Li'l champs मध्ये लहानमुलांच्या ऑडिशनसाठी निवड करण्यात आली आहे.देशभरातील ११ शहरांमध्ये हे ऑडिशन सुरु असून मधुरा आता प्रत्येक शहरात जाऊन प्रतिभावंत मुलांची निवड करणार आहे. लहानपणापासून गायनाची खूप आवड असणाऱ्या मधुराने त्यांच्या गुरु माधवी सोमन नंतर ८ वर्ष गुरु प्रदीप धोंड आणि नंतर डॉ.राम देशपांडे यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतलं. घरी संगीतमय वातावरण असल्याने मधुराला गायनासाठी घरातून नेहमीच पाठिम्बा मिळाला. स्पर्धक ते परीक्षक हा प्रवास विचारला असता 'हा प्रवास खूप मोठा आहे,खूप मोठं यश तिला मिळालं आहे' असं ती म्हणते.Sa Re Ga  Ma Pa नंतर मधुराला मिळालेला पहिला ब्रेक म्हणजे बालगंधर्व चित्रपटातील एक गाणं,यात मधुराने फक्त एकच पण खूप महत्वाची ओळ गायली आहे. एवढ्या मोठ्या चित्रपटासाठी तीच नाव सुचणं हीच खूप मोठी गोष्ट आहे असं मधुरा म्हणते. या चित्रपटानंतर अजिंठा,संदूक आणि वजनदार या  चित्रपटात गाणी गाऊन तिने स्वतःला सिद्ध केलं आहे. खूप गाजलेली मराठी मालिका होणार सून मी ह्या घरची चं दुसरं शीर्षक मधुराच्या आवाजाने सजलं आहे




                      परीक्षक म्हणून हा तिचा पहिलाच अनुभव आहे.लहान मुलांसाठी हा खूप चांगला अनुभव असणार आहे,मुलांनी काहीतरी शिकून जावं आणि हीच संधी असते आपली कला प्रेक्षकांना दाखवण्याची त्यामुळे कसलीच चिंता न करता मुलांनी फक्त शिकत जावं असं मधुराला वाटतं. इतर परीक्षकांसोबतचा अनुभव हि खूप मस्त असून प्रत्येकाचा एका विशिष्ट गाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळे अजूनही मी शिकतेय असं ती म्हणते.  लहानपणापासून आशाताई भोसले ची मोठी फॅन असलेल्या मधुराला त्यांना भेटण्याचा योग्य आला त्यावेळी आपली स्वप्नपूर्ती झाल्याचं हि ती सांगते. A.R.Rehman कडे एकदातरी गायला मिळावं अशी इच्छा हि तिने व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचं नाव उंचावणाऱ्या या गोड गळ्याच्या गायिकेला majja.ooo कढून खूप शुभेच्छा.





 majja.ooo : Ankita Lokhande.



Wednesday 21 December 2016

विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत उर्मिला कोठारे..

                     विठाबाई नारायणगावकर. एकेकाळी तमाशा क्षेत्रात गाजलेले नाव. वयाच्या 10व्या वर्षापासून घुंगरू बांधून कलाकार म्हणून प्रेक्षकांवर हुकुमत गाजवणारी लावणी सम्राज्ञी . सावळा, परंतु देखणा चेहरा, गोड गळा आणि त्याच्या वरचढ अभिनय अशा चमचमणा-या विठाबार्इंची भुरळ रसिकांना पडणे तसे स्वाभाविकच.विठाबाई नारायणगावकर या पहिल्या महिला कलाकार आहेत ज्यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होत . मायबाप प्रेक्षकांनी विठाबार्इंना ‘तमाशासम्राज्ञी’ ही पदवी बहाल केली.
                     येत्या पुढील वर्षात विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित ' विठा ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानिटकर-कोठारे साकारणार आहे. तिचा डॅशिंग अंदाज आपण या आधी गुरु आणि प्यार वाली लव्ह स्टोरी या चित्रपटात पहिला होता आता तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका उर्मिला कशी साकारतेय याच कुतुहूल प्रत्येकालाच असेल. या चित्रपटात उर्मिला सोबत उपेंद्र लिमये सुद्धा झळकणार आहे. या आधी उर्मिला ने आवाज या मालिकेसाठी राणी अहिल्याबाई होळकर हि भूमिका हि साकारली होती.


                     पुंडलिक धुमाळ दिग्दर्शित  ' विठा ' या चित्रपटाचे संवाद आणि पटकथा पुंडलिक धुमाळ आणि शांतनू रोडे यांनी केले असून संजय जाधव आणि देवेंद्र गोलटणकर यांनी चित्रपटाचे छायांकन केले आहे. अजित परब,समीर म्हात्रे,रोहित नागभिडे यांनी चित्रपटांची गाणी संगीतबद्ध केली आहे.तसेच फुलवा खामकर यांनी नृत्यदिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
                       तमाशाच्या फडावर बिजलीसारख्या कडाडणा-या विठाबार्इंची या चित्रपटाच्या निमित्ताने आठवण निघेल आणि नव्या पिढीला महाराष्ट्राच्या एका कोप-यातल्या तमाशा या कलाप्रकाराशी ओळख होईल.





majja.ooo : Ankita Lokhande.

Tuesday 20 December 2016

आमिर खान करणार मराठी चित्रपटांची प्रसिद्धी...

                          येत्या काही वर्षात मराठी चित्रपटांनी कमालीची उंची गाठली आहे. काही चित्रपटांनीतर मराठी बॉक्स ऑफिस चे सर्व रेकॉर्डस् तोडले. आता येणारे पुढील वर्ष हि प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. चित्रपट प्रेमींच्या मनोरंजनासाठी खास असे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांपैकी  एक चित्रपट म्हणजे सतीश राजवाडे यांचा 'ती सध्या काय करते'. एकूण चित्रपटाचा ट्रेलर बघता हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून जाणार हे जरी खर असलं तरी आनंदाची बातमी म्हणजे या चित्रपटाला आता बॉलीवूडची हि साथ मिळतेय. बॉलीवूडचा अभिनेता अमीर खान हा आता मराठी चित्रपटांची प्रसिद्धी करणार आहे.




                      सध्या गाजत असलेल्या त्याच्या दंगल चित्रपटासोबत तो  'ती सध्या काय करते' या चित्रपटाचे ट्रेलर महाराष्ट्राच्या प्रत्येक सिनेमागृहात दाखवणार आहे.मराठीतले गाजलेले चित्रपट नटसम्राट,नटरंग,कोर्ट,सैराट याचं त्याने कौतुक केलं असून तो आता मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धी साठी उत्सुक आहे. अंकुश चौधरी,तेजश्री प्रधान,अभिनय बेर्डे,आर्या आंबेकर हि  स्टार कास्ट घेऊन सतीश राजवाडे ६ जानेवारी २०१७ ला 'ती सध्या काय करते' हा चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपटांची गाणी खूप वेगळी असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत यात शंका नाही.प्रेमाची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर किती कमाल दाखवेल हे बघण्यासाठी ६जानेवारी ची वाट पाहावी लागेल.








majja.ooo : Ankita Lokhande.

Saturday 17 December 2016

संजय जाधव वळणार आता अभिनयाकडे.......

                     हल्ली दिग्दर्शक,निर्माते चित्रपटात अभिनय करतात यात काही नवल नाही. येत्या आगामी मराठी चित्रपटात दुनियादारी फेम दिग्दर्शक संजय जाधव हे पडद्यामागे नाहीतर पडद्यावर दिसणार आहे.संजय जाधव यांच्या फॅनसाठी नवीन वर्षात हि खास भेट असणार आहे यात शंका नाही.
                        मराठी आणि हिंदी चित्रपटांचे छायांकन आणि दिग्दर्शन केल्यानंतर त्यांचा गाजलेला सिनेमा म्हणजे दुनियादारी. हा चित्रपट बॉक्सऑफिस वर जोरात चालला. दुनियादारी मुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले संजय जाधव यांनी नंतर चित्रपटांची रांगच लावली. चेकमेट,रिंगा रिंगा,फक्त लढा म्हणा,दुनियादारी,प्यार वाली लव्ह स्टोरी,तू हि रे,गुरु यांसारखे हटके चित्रपट त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले. त्यानंतर प्रथमच निर्माते म्हणून झी मराठी वरील दिल दोस्ती दुनियादारी हि मालिका केली.




                         आता अभिनेता म्हणून नवीन ओळख करून देण्यासाठी संजय जाधव सज्ज झाले आहे.'लग्न मुबारक' या चित्रपटात संजय जाधव हे एका खास भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे नाव बघता यात मुस्लिम आणि लग्न असे काहीसे कथानक असेल असा अंदाज बांधता येतो. संजय जाधव यांनी साकारलेले मुस्लिम पात्र नक्की काय,असेल चित्रपटाचे कथानक काय असेल,चित्रपट कधी येईल हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. दिग्दर्शनासोबत अभिनय क्षेत्रातही संजय जाधव यांनी आपली छाप सोडावी यासाठी त्यांना majja.ooo कडून शुभेच्छा.



majja.ooo : Ankita Lokhande.

Thursday 15 December 2016

'मी आलो,मी पाहिलं,मी लढलो,मी जिंकून घेतलं सारं..... लक्ष्मीकांत बेर्डे '

                              मराठी आणि हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा आणि आपल्या विनोदाने सर्वांचं भरपूर मनोरंजन करणारा लक्षा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे. २६ ऑक्टोबर,१९५४ रोजी लक्ष्मीकांत चा जन्म झाला.
                              खेरवाडी युनिअन हायस्कूल मधून त्याने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. अभिनयाची आवड लक्ष्या ला लहानपणापासूनच होती.गणेशोस्तवातील नाटकात सहभाग घेऊन त्याने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरवात केली.कामाबद्द्ल प्रचंड उत्साह असलेल्या लक्ष्या ला पहिला ब्रेक मिळाला तो 'लेक चालली सासरला' या चित्रपटातून. त्याच्या भन्नाट अभिनयाने सर्व चित्रपटसृष्टीतील लक्ष त्याने वेधून घेतलं. 'दे  दना दन','धूम धडाका' या सारखे गाजलेले चित्रपट लक्ष्याच्या वाटेला आले.हे सुरु असतानाच १९८३-८४ मध्ये 'टूर -टूर' हे नाटक स्वीकारून त्याच्या अभिनयाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं.कॉमेडीच जबरदस्त टाईमिंग असलेला लक्ष्या एका रात्रीत विनोदाचा बादशाह झाला.त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही.या यशानंतर आम्ही दोघे राजा राणी,हमाल दे धमाल,अशी हि बनवा बनवी,बाळाचे बाप ब्रह्मचारी,एका पेक्षा एक,भुताचा भाऊ,थरथराट,धडाकेबाज,झपाटलेला,या आणि अश्या बऱ्याच चित्रपटात त्यांनी आपल्या विनोदाची छाप सोडली.
                            चित्रपटांबरोबर त्यांनी मराठी रंगभूमीवर काम केलं 'शांतेच कार्ट चालू आहे' या नाटकाने तर प्रेक्षकांना वेड लावून सोडलं. हा मराठी चित्रपटाचा प्रवास सुरु असतानाच त्यांना संधी भेटली ती हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्याची.त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे 'मैने प्यार किया' या चित्रपटाच्या यशा नंतर त्यांच्याकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली,हम आपके है कोन,मेरे सपनो की राणी,आरजू,साजन,बेटा,१००डेज या सारखे दर्जेदार चित्रपट त्यांच्या वाट्याला आले.
                                  लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सर्वात खास आणि जवळचे मित्र म्हणजे अशोक सराफ. लक्ष्मीकांत आणि अशोक सराफ ज्या चित्रपटात असतील तो चित्रपट विनोदाने परिपूर्ण असायचा . या यशस्वी जोडी ने विनोदाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे,सचिन पिळगांवकर,महेश कोठारे या दिग्गज मंडळींनी तर मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वर्चस्व गाजवलं. एवढं यश मिळून सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे हे अगदी शिस्तबद्ध कलाकार होते,रात्री कितीहि उशीर झाला तरी सकाळी ७ वाजता सेट वर मेकअप करून हजर असायचे.अचूक टाईमिंग आणि अद्वितीय अभिनय हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं वैशिष्ट्य.प्रयत्नांची पराकाष्टा करून त्यांनी तुफान लोकप्रियता मिळवली.
                   रुही बेर्डे या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नी,लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या संघर्षाच्या काळात  रुही बेर्डे  यांनी त्यांना मोलाची साथ दिली,लक्ष्मीकांत बेर्डे च्या या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे.रुही बेर्डे यांच्या निधनानंतर प्रिया अरुणशी त्यांनी विवाह केला. थरथराट,अशी हि बनवाबनवी, हम आपके है कोन यासारख्या चित्रपटात काम करून त्या जोडीने रसिकांच्या मनावर राज्य केलं.खूप कमी जणांना माहित आहे कि लक्ष्मीकांत बेर्डे यांना  गिटार वाजवण्याची आणि बाहुल्यांचा आवाज काढण्याची प्रचंड आवड होती. त्यांनी नंतर स्वतःच प्रोडक्शन हाऊस देखील सुरु केलं  त्याला त्यांनी 'अभिनय आर्ट्स'असं नाव दिलं आहे.

  'मी आलो,मी पाहिलं,मी लढलो,मी जिंकून घेतलं सारं' या त्यांच्या गाण्याप्रमाणे त्यांनी अख्खी चित्रपटसृष्टी आपल्या विनोदाने जिंकून घेतली. १९९० चे दशक आपल्या अभिनयाने गाजवल्या नंतर १६ डिसेंबर २००४ रोजी आपल्या लाडक्या लक्ष्याने अखेरचा श्वास घेतला. तो आज जरी नसला तरी त्याच्या विनोदाने रसिकांच्या मनात अजरामर झाला. विनोदसम्राट लक्ष्मीकांत बेर्डे यांना majja.ooo कडून भावपूर्ण श्रद्धांजली.





majja.ooo : Ankita Lokhande.

प्रवीण कुंवर यांच्या सुरांना भेटणार केतकी माटेगांवकर आणि रोहित राऊत यांच्या सुरांची साथ

                         चित्रपटात बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात मग ते चित्रपटाचं कथानक असो किंव्हा स्टार कास्ट असो हल्ली चित्रपटाचं संगीत हा खूप महत्वाचा घटक बनला आहे. प्रत्येकवेळी वेगळं संगीत देणं हे संगीतकारावर अवलंबून असतं.तसेच ते चांगल्याप्रकारे निभावणं हे गायक गायिकांवर निर्भर असतं.
                         महाराष्ट्रातील उभरती अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर आणि 'स रे गा मा पा' फेम  रोहित राऊत हि जबरदस्त जोडी आपल्याला एका नवीन मराठी चित्रपटात गाताना दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीतकार प्रवीण कुंवर हे असून त्यांनी याआधी 'पोलीस लाईन','या कोळीवाड्याची शान' या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. केतकी लहानपणापासून गातेय हे आपल्या सर्वाना माहित आहे त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवलं तिचा पहिला गाजलेला सिनेमा म्हणजे शाळा त्यानंतर काकस्पर्श,तानी,टाईमपास,फुंतरू असे अनेक चित्रपट देऊन तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यानंतर प्रियकरा, सुन्या सुन्या,कसा जीव गुंतला यासारखी गाणी गाऊन तिने तिच्या आवाजाची जादू देखील महाराष्ट्रभर पसरवली.







    'स रे गा मा पा' नंतर रोहितला मिळालेला पहिला ब्रेक म्हणजे दुनियादारी चित्रपटातील यारा यारा हे गाजलेलं गाणं त्यानंतर कॉफी आणि बराच काही,प्यार वाली लव्ह स्टोरी,गोलू-पोलु या सारख्या चित्रपटांसाठी आवाज दिलाय. आता हि जोडी कोणतं नवीन गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय याची वाट पाहावी लागेल.
                        चित्रपटाचं नाव आणि बऱ्याच गोष्टी सध्या तरी गुलदस्त्यात आहेत.


majja.ooo: Ankita Lokhande.

Saturday 10 December 2016

नागपूर अधिवेशन : एक सहल

                        नागपूर मध्ये दरवर्षी थंडी मध्ये हे अधिवेशन भरतं त्यालाच नागपूर अधिवेशन असं आपण म्हणतो यात लोकांचे बऱ्यापैकी प्रश्न सुटतात आणि काहींचे गृहीतच धरले जात नाही. या राजकीय अधिवेशनात नक्की काय काय होत हे आपल्याला माहीतच आहे. जर काही मुद्दे चित्रपटात ठाम पणे मांडले असते तर हा चित्रपट अजून बरा झाला असता.निर्माता-लेखक-दिग्दर्शक यांच्या वाटेला आलेला हा उत्कृष्ट विषय त्यांना योग्य पद्धतीने हाताळता आला नाही असं चित्रपट बघून कळतं. या चित्रपटात प्रत्येक गोष्टीच वरवरचं चित्र उभं केलंय.
                            मकरंद अनासपुरे,मोहन जोशी,भारत गणेशपुरे,संकर्षण कऱ्हाडे,अजिंक्य देव अशी जबरदस्त स्टार कास्ट असूनही चित्रपट यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत नाही. या सोबतच या चित्रपटात विनीत भोंडे,चेतन दळवी,अमोल ताले,दीपाली जगताप,स्नेहा चव्हाण यांनी हजेरी लावली आहे.काही कलाकारांमुळे विनोद निर्मिती होताना दिसते पण काहीवेळा विनोद अति होऊन त्या मागचा संदेश प्रेक्षकांजवळ पोहोचत नाही.त्यामुळे मनोरंजाच्या बाबतीत चित्रपट ठीक आहे असेल म्हणता येईल. चित्रपटात एकूण ४ गाणी आहेत. यथातथा वाटणारी हि गाणी जास्त वेळ प्रेक्षकांच्या मनात घर करत नाही.





                        विदर्भ पिक्चर्स प्रस्तुत निलेश जळमकर दिग्दर्शित अनिल जळमकर निर्मित 'नागपूर अधिवेशन' या सिनेमाला majja.ooo कडून १.१/२ स्टार.

majja.ooo : Ankita Lokhande.

Thursday 8 December 2016

मराठी सिनेमाला बिग बी आणि टायगर श्रॉफची उपस्तिथी...

                प्रेक्षकांच्या आवडीचा विषय चित्रपटात आला कि चित्रपट हिट होतोच. येत्या पुढील वर्षात असे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील यात शंका नाही. हल्ली चित्रपटांची नावं जरा हटके ठेवण्याची प्रथा सुरु झाली आहे, व्हेंटिलेटर,घंटा,फुगे या चित्रपटांची नावं हटके असल्यामुळे प्रेक्षकांचं विशेष लक्ष या चित्रपटांकडे वळतं. या सर्व चित्रपटांच्या रांगेत एक नवीन कोरा मराठी सिनेमा 'स्वामी तिन्ही जगाचा...भिकारी ' प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

                मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला अभिनेता स्वप्नील जोशी आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे त्या सोबतच रुचा इनामदार,सयाजी शिंदे,मिलिंद शिंदे, हे सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे.नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त.J.W.marriott मुंबई येथे झाला. यामध्ये अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफ यांनी खास उपस्थिती दर्शवली होती. गीतकार आणि कथानक हे गुरु ठाकूर यांनी केलं असून मिलिंद वामखेडेकर आणि विशाल यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटाची प्रसिद्धी हि दर्शन मुसळे करत आहेत.


                 मी मराठी फिल्म एंटरटेनमेंट प्रस्तुत  गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार निर्मित गणेश आचार्य दिग्दर्शित 'स्वामी तिन्ही जगाचा...भिकारी ' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी कोणता नवीन विषय घेऊन येतोय यासाठी पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल.

Majja.ooo : Ankita Lokhande

Wednesday 7 December 2016

२०१६ मधील सैराट नंतर अजय गोगावलेचा...

येत्या काही वर्षात मराठी चित्रपटाने कमालीची उंची गाठली आहे. वेगळं कथानक, तगडी स्टार कास्ट, मनाला वेड लावणारी गाणी या सर्व बाबतीत नावीण्य पाहायला मिळत आहे. पुढील नवीन वर्षात मराठी प्रेक्षकांसाठी बऱ्याच नवीन चित्रपटांची मेजवानी घेऊन कलाकार सज्ज आहेत असं म्हणायला हरकत नाही. या चित्रपटांमध्ये एक नवीन आगळा वेगळा मराठी चित्रपट 'रांजण' प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाचे नाव जरा हटके असल्यामुळे याचं कथानक नक्की काय असेल हे सांगता येत नाही.
                            नुकतंच या चित्रपटाचं मोशन पोस्टर हे प्रेक्षकांच्या भेटीस आल आहे. मोशन पोस्टर बघून हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल यात शंका नाही. चित्रपटाचं अजून एक वेगळपण म्हणजे या चित्रपटाचं गाणं. सैराट मधील 'सैराट झालं जी' गाण्यानंतर आता अजय गोगावलेने रांजण मधील 'लागीर झालं रं' हे गाणं गाऊन चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.


                            महागणपती एंटरटेनमेंट प्रस्तुत रवींद्र कैलास हरपळे निर्मित प्रकाश जनार्धन पवार लिखित आणि दिग्दर्शित 'रांजण' या चित्रपटाची इतर गाणी ,कथानक, स्टार कास्ट सध्या गुलदस्त्यात आहेत. चित्रपटाचे नाव कुतुहल वाढवणारं असून प्रेक्षकांच्या अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करेल कि नाही हे चित्रपट पाहूनच कळेल.



Majja.ooo : Ankita Lokhande

Sunday 4 December 2016

सुमित राघवन स्वानंदी टिकेकर सोबत रंगभूमीवर...

हल्ली मराठीचा प्रेक्षक वर्ग हा नाटक रंगभूमीकडे वळताना दिसत आहे. अशाच नाटक रसिक प्रेक्षकांसाठी सुदीप मोडक घेऊन येत आहेत एक आगळ वेगळं नाटक 'एक शून्य तीन'. नाटकाचं नाव बघता यात नक्की काय असेल हे लक्षात येत नाही.
               दिल दोस्ती दुनियादारी मध्ये तडफदार भूमिका साकारणारी मीनल उर्फ स्वानंदी टिकेकर पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. स्वानंदीच्या चाहत्यांसाठी ती एका हटके अंदाजात येतेय असं बोलायला हरकत नाही. स्वानंदी सोबत सुमित राघवन हे देखील मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. मराठीतील सुप्रसिद्ध पोस्टर डिझायनर मिलिंद मटकर (96 Studious) यांनी बनवलेले हे पोस्टर बघता नाटकाचं कथानक हे गंभीर आणि ट्विस्ट अँड टर्न्सने परिपूर्ण असेल यात काही शंका नाही. १०३ हा 'वूमन हेल्पलाईन नंबर' असून नाटकात तो कशाप्रकारे वापरण्यात आलाय हे नाटक बघूनच कळेल.


               नरेन चव्हाण प्रस्तुत अभिजीत साटम आणि रुजुता चव्हाण निर्मित सुदीप मोडक लिखित नीरज शिरवईकर आणि सुदीप मोडक दिग्दर्शित 'एक शून्य तीन' या नाटकाचा शनिवारी शिवाजी मंदिर दादर येथे शुभारंभाचा प्रयोग झाला. पात्र आणि कथा जाणून घेण्यासाठी नाटक पाहायला विसरू नका.

Majja.ooo : Ankita Lokhande

Saturday 3 December 2016

लक्ष्मीकांत बेर्डे नंतर आता जुनिअर लक्ष्या...

लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव जरी ऐकलं तरी आपल्याला आठवते ते त्यांचे विनोदी हास्य, साधा स्वभाव आणि मनोरंजक अभिनय. मराठीतील विनोदाचा स्थर त्यांनी एका वेगळ्याच टप्प्यावर नेऊन ठेवला आहे. याच अभिनयाचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांचा मुलगा 'अभिनय बेर्डे' याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
                स्टार किड्स  म्हंटल की त्यांच्यावर एक वेगळ्याच प्रकारचा दबाव असतो, अनेक नजरा त्यांच्यावर असतात. अश्या परीस्थिती मध्ये चांगली संधी मिळवण्यासाठी त्यांना धडपड करावी लागते आणि अशा वेळी आपण कुठे कमी पडता कामा नये हा एकच विचार त्यांच्या डोक्यात असतो. अभिनय बेर्डे हा मुंबईतल्या मिठीबाई कॉलेज मध्ये शिकत आहे. अभिनयाची आवड असल्याने त्याने नाटकाच्या ग्रुपमध्ये सहभाग घेऊन अनेक पारितोषिके ही मिळवली.


                आता हा जुनिअर लक्ष्या आपल्याला दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा आगामी चित्रपट 'ती सध्या काय करते'मध्ये दिसणार आहे. तसेच अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. अभिनय बेर्डे सोबत गायिका आर्या आंबेकर सुद्धा मराठी चित्रपटात पहिल्यांदा अभिनयाद्वारे झळकणार.
                 महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनय आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे.. दोघे दिसतात ही सारखे जर भविष्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचा विचार आला तर अभिनय बेर्डे ती भूमिका साकारेल का यावर सगळ्यांचं लक्ष्य आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा वारसा पुढे चालवणारा  जुनिअर लक्ष्या आपल्या अभिनयाची किती छाप सोडेल हा येणारा चित्रपटच सांगेल.

Majja.ooo : Ankita Lokhande

Wednesday 30 November 2016

उदय टिकेकर आणि शाहरुख खान...


मराठी स्टार आता हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकत आहे यात  काही नवल नाही.. सुप्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर  यांनी मराठी तसेच हिंदी मध्ये  त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे."लई भारी ","खो -खो ",तसेच हिंदी मध्ये "बर्फी ","रॉकी हँडसम "," मदारी "यातल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतात... तसेच छोट्या पडद्यावरती त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या आहेत "जुळून येति रेशीमगाठी "यामधील बाबाजी ची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहते..

हेच महाराष्ट्राचे लाडके बाबाजी आता किंग खान शाहरुख खान सोबत "रईस" या  चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्या अभिनयाच्या या प्रवासात हा चित्रपट खुप मोठा व महत्वाचा आहे असं ते म्हणतात. सध्याची परिस्थिती बघता त्यांनी या चित्रपटाबद्दल विशेष काही सांगण्यास नकार दिलाय. शाहरुख सोबत चा अनुभव विचारला असता त्यांनी शाहरुख चा विशेष कौतुक केलय , ते म्हणतात  शाहरुख सोबत चा अनुभव चांगला होता तो नेहमी नवीन शिकण्यात उत्सुक असतो ,दिग्दर्शक तसेच कलाकारांच्या नियमांचे पालन देखील तो करतो..आणि त्याच्या हा उत्साह पाहून त्यांच्या कॉलेज चे दिवस आठवले असे हि ते म्हणतात.
                मालिका व चित्रपट यात काय फरक जाणवला हे विचारले असता ते म्हणतात " मला व्यक्तिशः मालिका आणि चित्रपट यात फार फरक जाणवत नाही,  चित्रपटांच्या तुलनेत मालिकांमध्ये अधिक पैसे व प्रसिद्धी आहे,दोन्ही माध्यम वेगळी आहे चित्रीकरणाची पद्धत वेगळी आहे".
उदय टिकेकरांच्या हा प्रवास असाच सुरु राहूदे हि आमच्याकडून सदिच्छा....

             


Tuesday 29 November 2016

रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी चित्रपटाचा लुक...

सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी नेहमीच प्रेक्षकांनसमोर चित्रपटाद्वारे वेगवेगळे विषय मांडले आणि प्रेक्षकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला. नटरंग, बालकपालक, मित्रा ( बायोस्कोप ), बालगंधर्व, टाईमपास, टाईमपास २, बँजो या सुपरहिट चित्रपटानंतर रवी जाधव 'छत्रपती शिवाजी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.

अवघ्या महाराष्ट्राच आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर हा  मराठी सिनेमा बनणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री जेनेलिया डिसुझा करणार असून विशेष म्हणजे रितेश देशमुख यात शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर सोशल मिडियावर चांगलाच वायरल झाला, त्यात रितेश देशमुखचा लुक शिवाजी महाराजांसारखा आहे.



तसेच त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत, त्यामुळे  चित्रपटही असाच  दमदार मिळेल यात काही शंका नाही. दूरदर्शी, पराक्रमी, आणि मराठी जनतेचे स्मुर्तीस्थान असलेले  जानताराजा म्हणजेच शिवजा महाराज यांची व्यक्तिरेखा रितेश देखमुख कसा साकारतो हे पाहण्यासाठी आमच्यासारखीच तुम्हाला ही उत्सुक असणार हे नक्की. येत्या नवीन वर्ष्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो असे सूत्रांनुसार समजले आहे.